Saturday, 28 June 2014

राष्ट्रीयीकरणासाठी तरुणांची प्रचारमोहीम

बबन लिहिणार
मुंबई, -  देशातील शिक्षण, आरोग्य आणि जमिनीचे राष्ट्रीयीकरण झाले पाहिजे या आणि इतर मागण्यांसाठी मुंबईतील काही तरुणांनी पुढाकार घेत समाजात जनजागृती करायचे ठरवले आहे. त्यासाठीच त्यांनी एका प्रचारमोहिमेचे आयोजन केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून उद्या बुधवारी महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून पुण्यातील फुलेवाडय़ापासून या प्रचार मोहिमेला प्रारंभ करण्यात येणार आहे. याद्वारे समाजात राष्ट्रीयीकरणाबाबत जनजागृती करणार आहेत. 11 एप्रिल ते 14 एप्रिलदरम्यान ते समाजातील अनेक लोकांशी संवाद साधून त्यांना राष्ट्रीयीकरणाचे महत्त्व पटवून देणार आहेत.
देशात सुरू असलेल्या खासगीकरणाच्या `वळू’ला लवकरच थांबविणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्यातील तरुणांना राष्ट्रीयीकरणाबाबत प्रचार मोहिमेच्या माध्यमातून जनजागृती करणे गरजेचे आहे. त्यासाठीच या प्रचार मोहिमेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मुख्य निमंत्रक अमोल मडामे यांनी `नवशक्ति’ला दिली. देशात सध्या खासगीकरणाचे वारे जोरात वाहत आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून 62 वर्षे पूर्ण झाली. मात्र या वर्षांत राष्ट्रीयीकरणाऐवजी खासगीकरणाचेच वादळ सुरू आहे. या वादळात गरीब-दलित, उपेक्षित समाज भरडला जात असून याचे कुणालाच कवडीचेही सोयरसुतक नाही. खासगीकरणाला खतपाणी घालण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारमध्ये चढाओढ सुरू आहे. एकीकडे मागासवर्गीय विद्यार्थ्यांची फी माफ करण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. मात्र दुसरीकडे हेच सरकार हिरे व्यापार्यांना 10 हजार कोटींची सबसीडी देत आहेत. हा सर्व प्रकार संताप आणणारा आहे, असे मडामे म्हणाले. संविधानाला डावलून शिक्षण क्षेत्रात बजबजपुरी माजली जात आहे. शिक्षणाचे राष्ट्रीयीकरण महत्त्वाचे आहे. खासगीकरणामुळे शिक्षणाची दुर्दशा होत असताना आरोग्य व्यवस्थेतही यापेक्षा वेगळी परिस्थिती दिसत नाही. रुग्णांना सर्रासपणे ग्राहक समजून दिवसाढवळ्या त्यांना लुटले जात आहे. मानवतावादी दृष्टिकोन विकसित करण्यासाठी आरोग्य सेवेचे राष्ट्रीयीकरण महत्त्वाचे आहे.
समाजात मोठय़ा प्रमाणावर गरीब-श्रीमंतांमध्ये जी दरी निर्माण होत आहे त्याचे प्रमुख कारण म्हणजे आर्थिक संसाधनाचे असमान वाटप होय. त्यामुळे सर्वात आधी असमानतेची दरी मिटवायची असेल तर जमिनीच्या राष्ट्रीयीकरणाची आवश्यकता आहे. देशात विशेषतः विदर्भात ज्या शेतकर्यांच्या आत्महत्या होत आहे त्या थांबवायच्या असतील तर जमिनीच्या राष्ट्रीयीकरणाशिवाय पर्याय नाही. त्याचप्रमाणे समानता प्रस्थापित करण्यासाठी तसेच आर्थिक लोकशाहीचा पाया उभारण्यासाठी खासगी क्षेत्रात आरक्षणाची आवश्यकता आहे. यासारख्या महत्त्वपूर्ण प्रश्नांवर समाजात जनजागृती व्हावी या उद्देशाने या प्रचारमोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या 11 एप्रिल रोजी महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंतीदिनी त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पुण्यातील काही वस्त्यांमध्ये जाऊन राष्ट्रीयीकरणाबाबत जनजागृती केली जाणार आहे. त्यानंतर पुणे ते पनवेलमार्गे मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे. पनवेलमध्ये आगरी समाजात जाऊन राष्ट्रीयीकरणाबाबत जनजागृती केल्यानंतर चेंबूरमार्गे 14 एप्रिल रोजी मुंबईच्या चैत्यभूमीवर प्रचारमोहिमेचा समारोप करण्यात येणार आहे. यावेळी चैत्यभूमीवर एक  छोटीशी सभा होणार आहे. त्या ठिकाणी राष्ट्रीयीकरणाचे महत्त्व पटवून देण्यात येणार असल्याचेही मडामे यांनी सांगितले. समाजात राष्ट्रीयीकरणाबाबत जनजागृती व्हावी यासाठी प्रजासत्ताक भारत संघटना, निसेक्ट, ऋणानुबंध अभियान, आगरी समाज प्रबोधिनी, सत्यशोधक कामगार संघटना आदींनी सहभाग घेतला आहे. तसेच या कार्यक्रमासाठी जगदीश नगरकर, एन.एल. साव, आनंदा होवाळ, राजाराम पाटील, मूलनिवासी माला, सुनील चव्हाण, रवींद्र गुरचळ, अभिजित माळी, नमिता दोंदे, वर्षा गंभीरे, कवीराज सिंघेलिया, ऍड. आनंद चौहान, डॉ. रेखा बहनवाल, सतिश गायकवाड, सागर तायडे आदी प्रयत्नशील आहेत.

बाबासाहेबांचे कार्य ‘जाती’मुळे झाकोळले

बबन लिहिणार 
मुंबई, - भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ दलितांसाठीच लढा पुकारला नाही तर तो समस्त मानवजातीसाठी पुकारला. आंबेडकर हे विचारवंताचे विचारवंत होते मात्र येथील तथाकथित लोकांनी त्यांना जातीपलिकडे पाहिले नाही. त्यामुळेच त्यांचे राष्ट्रीय कार्य झाकोळले गेल्याची खंत खासदार भालचंद्र मुणगेकर यांनी आज ‘संविधान गौरव दिनी’ व्यक्त केली. डॉ. बाबासाहेब इन्स्टिट्यूट ऑफ सोशल ऍन्ड इकॉनॉमिक चेंज, या संस्थेच्यावतीने बाबासाहेबांच्या ‘ऍनिहिलेशन ऑफ कास्ट’ अर्थात ‘जातीप्रथेचे विध्वंसन’ या ऐतिहासिक ग्रंथाचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त त्यांनी प्रेस क्लबमध्ये पत्रकारांना माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. डॉ. आंबेडकरांनी राष्ट्रासाठी अनेक कार्य केले. देशात रूढ असलेल्या जातीप्रथेविरूद्ध महात्मा फुले यांच्यानंतर लढा देण्याचे काम खर्‍या अर्थाने बाबासाहेबांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हयातीतील ३७ वर्षे जातीव्यवस्थेचे निर्मूलन आणि उच्चाटन करण्यासाठी घालवले. देशात आंबेडकर अनुयायी महिनाभर भीमजयंती साजरी करतात. मात्र इतर लोक त्यापद्धतीने करत नाहीत. देशात सुरू असलेला जातीवाद बाबासाहेबांना कधीच मान्य नव्हता. एकदा बाबासाहेबांना जातपातक तोडक मंडळाने एका वार्षिक अधिवेशनात अध्यक्षपद देऊन भाषणासाठी बोलावले. मात्र बाबासाहेबांना जाती व्यवस्थेवर बोलण्यास मज्जाव केला. त्यावेळी बाबासाहेबांनी त्यांना स्पष्टपणे निक्षूण सांगितले की ‘मला अध्यक्ष करा असे मी तुम्हाला सांगितले नाही, त्यामुळे मी माझे भाषण बदलणार नाही. माझं अध्यक्ष भाषण झालं नाही तरी चालेल पण मी भाषणाचा एक स्वल्पविरामही बदलणार नाही. त्यानंतर ते भाषण प्रसिद्ध करण्यात आले. या भाषणावर महात्मा गांधी यांनी डॉ. आंबेडकर हे हिंदू धर्माला आव्हान आहे अशी टीका केली होती अशी आठवणही त्यांनी उपस्थितांना करून दिली. जातीव्यवस्था ही समाजाला लागलेली कीड आहे. त्यामुळे जाती निमुर्लन झाले तर देशाची प्रगती होईल. आज अनेक ठिकाणी समाजात समानता असल्याचे दाखवण्यात येते. त्यासाठी खान-पान, पार्ट्या , राहणीमान एकमेकांच्या धर्माविषयी आदर असल्याचे दाखविले जाते मात्र ज्यावेळी लग्नाचा विषय निघतो त्यावेळी त्याची सर्वात आधी ‘जात ’पाहिली जाते. देशातील जातीनिमूर्लन कायमचे नष्ट करायचे असेल तर त्यासाठी आज मोठ्या प्रमाणात आंतरजातीय विवाह होणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. राज्यात २६ नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान गौरव दिन’ म्हणुन साजरा करण्यात येतो. मात्र या दिवशी चौथा शनिवार आल्याने प्रशासनाने एका परिपत्रकाद्वारे हा गौरव आदल्या दिवशी साजरा करण्याचे ठरवल्याने अनेक ठिकाणी गोंधळ पाहावयास मिळाला. ‘संविधान गौरव दिन’ आदल्या दिवशी साजरा करणे कितपत योग्य आहे असा प्रश्‍न मुणगेकर यांना विचारला असता ते म्हणाले की, मला याबाबत माहित नाही. पण ‘संविधान गौरव दिन’ साजरा करणारे देशातील महाराष्ट्र राज्य हे एकमेव आहे. गेल्यावर्षी हा दिवस २६ नोव्हेंबर रोजीच साजरा करण्यात आला होता, अशी आठवणही त्यांनी करून दिली. अण्णा हजारे आणि शरद पवार प्रकरणावरही त्यांनी आपले मत मांडले. अण्णा हजारे यांनी चालवलेल्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनांचे आपण वैयक्तीकरित्या समर्थन करतो पण अण्णा हजारे यांनी चालवलेली माझेच ऐका ही आडमुठेपणाची भुमिका आपल्याला मान्य नाही. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यावर माथेफिरूने केलेला हल्ला हा दुर्दैवी असून त्याचा आपण निषेध करत असल्याचे सांगितले. राज्यात येऊ पाहणारे खाजगी विद्यापीठ हे गरीब विद्यार्थ्यासाठी नुकसानकारक असल्याचेही त्यांनी सांगितले.