Saturday, 28 June 2014

राष्ट्रीयीकरणासाठी तरुणांची प्रचारमोहीम

बबन लिहिणार
मुंबई, -  देशातील शिक्षण, आरोग्य आणि जमिनीचे राष्ट्रीयीकरण झाले पाहिजे या आणि इतर मागण्यांसाठी मुंबईतील काही तरुणांनी पुढाकार घेत समाजात जनजागृती करायचे ठरवले आहे. त्यासाठीच त्यांनी एका प्रचारमोहिमेचे आयोजन केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून उद्या बुधवारी महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून पुण्यातील फुलेवाडय़ापासून या प्रचार मोहिमेला प्रारंभ करण्यात येणार आहे. याद्वारे समाजात राष्ट्रीयीकरणाबाबत जनजागृती करणार आहेत. 11 एप्रिल ते 14 एप्रिलदरम्यान ते समाजातील अनेक लोकांशी संवाद साधून त्यांना राष्ट्रीयीकरणाचे महत्त्व पटवून देणार आहेत.
देशात सुरू असलेल्या खासगीकरणाच्या `वळू’ला लवकरच थांबविणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्यातील तरुणांना राष्ट्रीयीकरणाबाबत प्रचार मोहिमेच्या माध्यमातून जनजागृती करणे गरजेचे आहे. त्यासाठीच या प्रचार मोहिमेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मुख्य निमंत्रक अमोल मडामे यांनी `नवशक्ति’ला दिली. देशात सध्या खासगीकरणाचे वारे जोरात वाहत आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून 62 वर्षे पूर्ण झाली. मात्र या वर्षांत राष्ट्रीयीकरणाऐवजी खासगीकरणाचेच वादळ सुरू आहे. या वादळात गरीब-दलित, उपेक्षित समाज भरडला जात असून याचे कुणालाच कवडीचेही सोयरसुतक नाही. खासगीकरणाला खतपाणी घालण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारमध्ये चढाओढ सुरू आहे. एकीकडे मागासवर्गीय विद्यार्थ्यांची फी माफ करण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. मात्र दुसरीकडे हेच सरकार हिरे व्यापार्यांना 10 हजार कोटींची सबसीडी देत आहेत. हा सर्व प्रकार संताप आणणारा आहे, असे मडामे म्हणाले. संविधानाला डावलून शिक्षण क्षेत्रात बजबजपुरी माजली जात आहे. शिक्षणाचे राष्ट्रीयीकरण महत्त्वाचे आहे. खासगीकरणामुळे शिक्षणाची दुर्दशा होत असताना आरोग्य व्यवस्थेतही यापेक्षा वेगळी परिस्थिती दिसत नाही. रुग्णांना सर्रासपणे ग्राहक समजून दिवसाढवळ्या त्यांना लुटले जात आहे. मानवतावादी दृष्टिकोन विकसित करण्यासाठी आरोग्य सेवेचे राष्ट्रीयीकरण महत्त्वाचे आहे.
समाजात मोठय़ा प्रमाणावर गरीब-श्रीमंतांमध्ये जी दरी निर्माण होत आहे त्याचे प्रमुख कारण म्हणजे आर्थिक संसाधनाचे असमान वाटप होय. त्यामुळे सर्वात आधी असमानतेची दरी मिटवायची असेल तर जमिनीच्या राष्ट्रीयीकरणाची आवश्यकता आहे. देशात विशेषतः विदर्भात ज्या शेतकर्यांच्या आत्महत्या होत आहे त्या थांबवायच्या असतील तर जमिनीच्या राष्ट्रीयीकरणाशिवाय पर्याय नाही. त्याचप्रमाणे समानता प्रस्थापित करण्यासाठी तसेच आर्थिक लोकशाहीचा पाया उभारण्यासाठी खासगी क्षेत्रात आरक्षणाची आवश्यकता आहे. यासारख्या महत्त्वपूर्ण प्रश्नांवर समाजात जनजागृती व्हावी या उद्देशाने या प्रचारमोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या 11 एप्रिल रोजी महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंतीदिनी त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पुण्यातील काही वस्त्यांमध्ये जाऊन राष्ट्रीयीकरणाबाबत जनजागृती केली जाणार आहे. त्यानंतर पुणे ते पनवेलमार्गे मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे. पनवेलमध्ये आगरी समाजात जाऊन राष्ट्रीयीकरणाबाबत जनजागृती केल्यानंतर चेंबूरमार्गे 14 एप्रिल रोजी मुंबईच्या चैत्यभूमीवर प्रचारमोहिमेचा समारोप करण्यात येणार आहे. यावेळी चैत्यभूमीवर एक  छोटीशी सभा होणार आहे. त्या ठिकाणी राष्ट्रीयीकरणाचे महत्त्व पटवून देण्यात येणार असल्याचेही मडामे यांनी सांगितले. समाजात राष्ट्रीयीकरणाबाबत जनजागृती व्हावी यासाठी प्रजासत्ताक भारत संघटना, निसेक्ट, ऋणानुबंध अभियान, आगरी समाज प्रबोधिनी, सत्यशोधक कामगार संघटना आदींनी सहभाग घेतला आहे. तसेच या कार्यक्रमासाठी जगदीश नगरकर, एन.एल. साव, आनंदा होवाळ, राजाराम पाटील, मूलनिवासी माला, सुनील चव्हाण, रवींद्र गुरचळ, अभिजित माळी, नमिता दोंदे, वर्षा गंभीरे, कवीराज सिंघेलिया, ऍड. आनंद चौहान, डॉ. रेखा बहनवाल, सतिश गायकवाड, सागर तायडे आदी प्रयत्नशील आहेत.

No comments:

Post a Comment